छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेतील स्थायी समितीसह विविध पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड दि.५ रोजीच झाली आहे. या सदस्यांमधून सभापती निवडीसाठी दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राहतील, असे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत.
मनपात गुरुवारी झालेल्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर महिला व बालकल्याण, शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य, शहर सुधार या पाच समित्यांवरील सदस्य निवडण्यात आले. या सदस्यांमधून आता त्या-त्या समितीच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून विशेष सभेची तारीख आणि पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेत विशेष सभा आयोजित करण्याबाबत मनपाला पत्राद्वारे कळविले आहे.
या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राहतील असे कळविले आहे. दरम्यान सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या स्थायी समितीकडे असताता. यामुळे ही समिती महत्वाची असते.











