शहर रॉकेल मुक्त !

Foto

औरंगाबाद: एकेकाळी दैनंदिन व्यवहारात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या रॉकेल पासून आता शहराला मुक्ती मिळाली आहे. शंभर टक्के रेशन कार्ड धारकांकडे  गॅस जोडणी असल्याने शहरातील रॉकेलचा कोटा पूर्णतः कमी करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

रेशन कार्ड धारकांकडे गॅस असेल तर  अशा रेशन कार्डधारकांना रॉकेल दिल्या जात नाही.  गेल्या वर्षांभरापासून पुरवठा विभागाने गॅस स्टॅम्पिंग ची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार शहरातील जवळपास शंभर टक्के रेशन कार्ड धारकांकडे गॅस जोडणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुरवठा विभागाने रॉकेलचा कोटा पूर्णतः कमी केला. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासूनच  रेशनद्वारेद्वारे मिळणारे रॉकेल बंद झाल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. जिल्ह्यात सात लाखांहून अधिक तर शहरात जवळपास अडीच लाख रेशन कार्ड धारक आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी ३४८ के एल एवढा रॉकेलचा पुरवठा केला जातो.  शहरासाठी मात्र थेंबभरही रॉकेल पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदाराला दिले जात नाही शहरात जवळपास दोन लाख पन्नास हजाराहून अधिक रेशन कार्ड धारक आहेत पुरवठा विभागाच्या नियमानुसार गॅस जोडणी असलेल्या रेशन कार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही. गॅस कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रत्येक रेशन कार्डधारकाकडे  गॅसची जोडणी आहे. त्यामुळे शहरातील रॉकेलचा कोटा पूर्णतः कमी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागात मात्र गॅस जोडणी नसल्याने महिन्याकाठी ३४८ केएल एवढे रॉकेल रेशन कार्डधारकांना वितरित केल्या जाते.

अंत्यसंस्कारालाही मिळेना रॉकेल..
 दरम्यान, गॅस जोडणी असल्याचे सांगून रेशन विभागाने शहरात येणाऱ्या रॉकेलचा कोटा बंद केला आहे. त्यामुळे लिटर भरही रॉकेल मिळणे दुरापास्त झाले. गरिबांना अंत्यसंस्कारासाठी ही रॉकेल मिळणे कठीण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.