छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीरबाजार येथील आठवडी बाजार बंद करण्याची घोषणा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि.२५) अर्थसंकल्प सादर करताना केली. आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वादविवाद होऊन मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका स्थापन होण्यापूर्वी सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याची घोषणा त्यांनी केली. शहरात चिकलठाणा, जाफरगेट आणि शहानुरमिया दर्गा भागात पीर बाजार म्हणून आठवडी बाजार भरवला जातो. या आठवडी बाजारात फिरत्या विक्रेत्यांसह परिसरातील शेतकरीदेखील भाजीपाला, धान्य घेऊन विक्रीसाठी येतात. दर आठवड्यात प्रत्येक बाजारात साधारणपणे २५ ते ५० लाख रुपयांची उलाढाल होते. आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात होत असल्याने वादविवाद होतात. तसेच बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते.








