जोडाक्षरे नको असलेले ‘गणित’ बनले डोकेदुखी ;इंग्रजी विषयाचीच झाली दुसरीत कॉपी

Foto


औरंगाबा : एकीकडे कॉपीमुक्‍त  अभियानावर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय मातृभाषेवरही भर दिला जात आहे, परंतु प्रत्यक्षात दुसरीकडे मात्र इंग्रजी माध्यमांची मराठी माध्यमांच्या अभ्यासक्रमात कॉपी केल्याचे दिसते. दुसरीच्या ‘गणित’ विषयातील बदल पाहता इंग्रजी गणित विषयाची कॉपी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचीही डोकेदुखी वाढली आहे. 

यावर्षी इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमात ‘गणित विषय’ विद्यार्थ्यांना संभ्रमात पाडणारा दिसत आहे. त्यात ऐकेचाळीस ऐवजी ‘चाळीस एक’ असे शिकविले जात आहे. याशिवाय एकवीस म्हणण्याऐवजी ‘वीस एक’, बावीसऐवजी ‘वीस दोन’ असे विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. जोडाक्षरे नको म्हणून हा नवीन पर्याय काढलेला आहे. परंतु यामुळे विद्यार्थ्यांना गणित सोपे वाटण्याऐवजी अवघड वाटत आहे. इयत्ता दुसरीत मुले असे गणित शिकतील. परंतु इयत्ता तिसरीत गेल्यावर विद्यार्थ्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणेच गणित शिकवावे लागणार आहे. याचा विचारही होणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

मराठी विषयात तर जोडाक्षरे आहेतच
एकीकडे जोडाक्षरे नको म्हणून दुसरीतील गणितात बदल केला आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु मराठी विषयात बदल का नाही केला? असाही प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. कारण गणित विषयातून जोडाक्षरे वगळले तरी मराठी विषयात जोडाक्षरे विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहेतच,मग गणित विषयात हा बदल का केला? असा प्रश्‍न आता सर्वत्र उपस्थित होत आहे.