फुलंब्री, फुलंब्री नगरपंचायतीच्या मतदार यादीचा गोंधळ संपता संपेना. शहरात १७ हजार ६३० मतदारसंख्या आहे. शेकडो नागरिकांची नावे त्यांच्या राहत्या प्रभागांऐवजी इतर प्रभागांमध्ये टाकण्ली आहेत. या प्रकारामुळे नागरिक आणि इच्छुक उमेदवार दोघेही अडचणीत आले आहेत.
नगरपंचायतीने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल चार हजार ३०१ आक्षेप नागरिकांनी नोंदवले होते. मात्र, नावे दुरुस्त करण्याऐवजी, शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमधील मतदारांची नावे एकमेकांत हलवण्यात आली. यात सर्वाधिक गोंधळ प्रभाग क्रमांक ८ मध्ये झाल्याचे समोर आले आहे. येथे ४०० पेक्षा जास्त नावे इतर प्रभागांमधून टाकण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, या मतदारांपैकी एकही मतदार प्रत्यक्षात प्रभाग ८ मध्ये राहत नाही. बाहेरच्यांची नावेही यादीत फक्त शहरातील नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जालना लोकसभा मतदारसंघातील वैजापूर, कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांतील मतदारांची नावेही प्रभाग ८ मध्ये समाविष्ट झाल्याचे समोर आले आहे. प्रभाग ८ मध्ये एकूण ११९४ मतदार असून, त्यातील गोंधळाचे आकडे असे प्रभाग ११ मधून १०५, प्रभाग ७ मधून ४९, प्रभाग १४ मधून २२, प्रभाग १ मधून २८, प्रभाग २ मधून २१, प्रभाग १० मधून २३, वैजापूर तालुका ५, कन्नड तालुका -४, सिल्लोड तालुका ५. इच्छुक उमेदवाराचा हात असल्याची चर्चा प्रभाग क्रमांक ८ मध्ये एका इच्छुक उमेदवाराने नगरपंचायत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपल्या मर्जीतील तब्बल ४०० नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेतल्याची चर्चा संपूर्ण फुलंब्री शहरात जोरात सुरू आहे. या मतदार यादीतील फेरफार राजकीय हेतूने झाला का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.











