चिकलठाणा विमानतळावर सांजवार्ता ‘बुम’
सांजवार्ताच्या पत्रकाराला दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी स क्वारंटाईनच्या शिक्क्याने त्वचा रोग होतो म्हणे..!
औरंगाबाद शहरात गेल्या 20 दिवसांपासून 1500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण दरदिवशी 75 रुग्ण इतके होते. आज तर रेकॉर्ड बे्रक 137 रुग्णांची नोंद झाली आहे. शहर दहशतीखाली आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर उद्योगचक्र फिरु लागल्याचे दिसत असतानाच अनेक कंपन्यांतून कामगार कोरोना बाधित होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. ही एक वेगळीच समस्या निर्माण झालेली असताना शुक्रवारी दिल्लीहून इंडिगो विमानाने आलेल्या 53 प्रवाशांना क्वारन्टाईनचा शिक्काही न मारता घरी सोडण्यात आले. हा मुद्दा सांजवार्ताला महत्त्वाचा वाटला. खरे तर ही बाब आरोग्य यंत्रणेशी संबंधित आहे. खुलासा आलाच तर त्यांच्याकडून अपेक्षित होता. परंतु आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी असा प्रकार घडला आणि आरोग्य यंत्रणेऐवजी चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी अक्षरशः नागिन डान्स सुरू केला.
दरम्यान, सांजवार्ताच्या या वृत्तानंतर आजपासून विमानातून येणार्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का मारण्यात येणार असल्याचे जिल्हा शिल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांजवार्ताला सांगितले. ते म्हणाले की, विमानातून येणारा प्रवाशी हा सुशिक्षित असतो त्याने स्वतःवरच काही बंधणे लादून घेणे अपेक्षित असते. त्यामुळे शिक्का मारण्याऐवजी त्यांना या संदर्भात तोंडी निर्देश देण्याचे ठरले होते. औरंगाबाद शहर सुशिक्षितांचे असतानाही कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर हे मात्र खरे असे म्हणत त्यांनी शिक्का मारणे आवश्यक असल्याचे कबूल केले.
आजपासून मारणार क्वारन्टाईनचे शिक्के
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांजवार्ताला सांगितले की, कालचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी माझी चर्चा झाली. पुणे, मुंबई विमानतळावर येणार्या प्रवशांच्या हातावर होम क्वारन्टाईनचे शिक्के मारण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत पुणे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने तेथे शिक्के मारले जातात. परंतु औरंगाबाद डोमॅस्टिक विमानतळ असल्याचे मी जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र त्यांनी आजपासून विमान प्रवाशांच्या हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का आदेश दिला.
विमानतळ संचालकाने दिली धमकी
सांजवार्ताने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीत विमानतळ प्राधिकरण किंवा संचालक यांच्याबद्दल एकही शब्द लिहिलेला नाही. हा प्रश्न आरोग्य यंत्रणेशी संबंधित होता त्यामुळे चिकलठाणा विमानतळाचा संबंध ओढून ताणून आणण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र हे वृत्त विमानतळ प्राधिकरणाची बदनामी करणारे आहे असा बादरायण संबंध जोडीत विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी संध्याकाळी सांजवार्ताचे प्रतिनिधी सतीश जोशी यांना थेट मोबाईल करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावेळी असंख्य प्रकारचे तारे त्यांनी तोडले आहेत. क्वारन्टाईनचा शिक्का हातावर मारल्याने त्वचारोग होत असल्याचा नवीन शोधही त्यांनी यानिमित्त जोशी यांना ऐकवला. हे सर्व संभाषण सांजवार्ताकडे रेकॉर्ड केलेले आहे.