औरंगाबाद: मृत्यूचा सापळा अशी ओळख असलेल्या जालना रोडवर अपघाताची मालिका काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गेल्या आठ दिवसांपासून दररोज या रोडवर अपघात होत आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास गोदावरी महामंडळाच्या कार्यालयासमोर एका क्रूझर (एमएच- २८, एझेड. ३४५९)ला डस्टर(एमएच -२०, इइ ११४४) कारने पाठीमागून ठोकले. सुदैवाने या अपघातात लग्नासाठी जाणारे महिला तसेच चिमुकले बालंबाल बचावले.
आकाशवाणी सिग्नल सुटल्यानंतर वाहने बेफाम धावतात. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी येथे अक्षरश ट्राफिक जाम होत असते. वेगवेगळे प्रयोग करूनही आकाशवाणी सिग्नलचा तिढा वाहतूक पोलीस विभागाकडून सुटला नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या क्रुझरच्या ड्रायव्हरने गोदावरी महामंडळाच्या कार्यालयासमोर एका दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी ब्रेक दाबले. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या डस्टरने या क्रूझरला जोरदार धडक दिली. क्रुझरमध्ये महिला तसेच चिमुकले होते. या अपघाताने त्यांना प्रचंड धक्का बसला. महिला आणि छोटी बालके मोठ्याने रडू लागली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. डस्टर कारचे मात्र मोठे नुकसान झाले.
डस्टर चालक मोबाईलवर बोलत होता?
दरम्यान, बेफाम धावणारा डस्टर चालक सिग्नल सुटल्यानंतर मोबाईलवर बोलत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळेच क्रुझरने ब्रेक दाबल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही, अन त्याने सरळ क्रूझरला पाठीमागून धडक दिली. डस्टर कारचे या अपघातात मोठी नुस्कान झाले आहे.
जालना रोडवर अपघातांची मालिका सुरू आहे. काल हॉटेल रामगिरी समोर एका इसमाला धडक देऊन वाहन पसार झाले होते. रामगिरी जवळच न्यायालय चौक सिग्नलवर कायम अपघात होत असतात. येथील सिग्नल व्यवस्थेत दोष असल्याचे नागरिक सांगतात. तरीही वाहतूक विभागाने येथील सदोष सिग्नल अद्याप बदलले नाही. त्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.