शिवसेना - मनसे युतीबाबतच्या हालचालींना वेग , संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी घेतली राज ठाकरेंची भेट...

Foto
मुंबई : मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच ठाकरे गटाचे नेते सक्रीय झाले असून, शिवसेना - मनसे युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा, जागावाटपाचा फॉर्म्युला, जागावाटप यांसारख्या प्रश्नांवर अनिल परब यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.  मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा कधी करायची, याबाबत दोन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. तसेच जागावाटपाचा फॉर्म्युला, जागावाटप या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. चर्चेअंती जो काही निर्णय शेवटी होईल, तो कळवला जाईल, असे अनिल परब यांनी सांगितले.

आमचा शेवटपर्यंत असाच प्रयत्न राहणार आहे की...

मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल परब यांनी म्हटले की, काँग्रेसच्या बाबतीत मी आत्ता आपल्याला काहीच सांगू इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना अंतिम स्वरुप आले की, आम्ही कळवू. चर्चेतील तपशील सांगितले जात नाहीत. निर्णय सांगितला जातो. वर्षा गायकवाड यांचे जे काही म्हणणे आहे, त्याचा विचार करून आम्हाला एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. आम्ही आजही महाविकास आघाडीत आहोत आणि आमचा शेवटपर्यंत असाच प्रयत्न राहणार आहे की, महाविकास आघाडी एकत्र राहावी. वर्षा गायकवाड यांचे ते मत आहे. आमचे मत असे आहे की, महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे, असे अनिल परब म्हणाले.

महाविकास आघाडी अभेद्य राहावी, अशी आमची इच्छा

आम्ही आधीच महाविकास आघाडीचा एक भाग आहोत. आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडी अभेद्य राहावी. आता यात काँग्रेस काय निर्णय घेते, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याचा अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो. ज्या दिवशी अंतिम निर्णय होईल, त्या दिवशी आपल्याला कळवू. काँग्रसेच्या हायकमांडशी चर्चा करायची की नाही, याबाबत आमचे नेते निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, गेली २५ वर्ष शिवसेना मुंबईत आहे. मुंबईकरांचे प्रेम अजूनही शिवसेनेवर आहे. आरोप करणारे आरोप करत राहतील. निवडणुका लागलेल्या आहेत. निकालात काय ते चित्र स्पष्ट होईल, असे अनिल परब यांनी सांगितले.