पैठण शहरातील हटवलेले अतिक्रमण जैसे थे

Foto
पैठण, (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या वतीने यात्रा मैदानातील तसेच शहरातील अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात येत आहे. मात्र हटवण्यात आलेले अतिक्रमण राजकीय हस्तक्षेपाने काही तासातच पुन्हा जैसे थे करण्यात आले आहे.

गुरुवारी संभाजी चौक ते कोर्ट रोड या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दुकानासमोर लावण्यात आलेले पत्र्याचे शेड तसेच विनापरवाना लावलेले, स्टॉल टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले होते. परंतु दुपारनंतर अतिक्रमण हटाव पथक माघारी फिरल्यानंतर संभाजी
चौकातील रिक्षा स्टॅन्ड जवळ काढण्यात आलेली टपरी पुन्हा लावली आहे. आता संबंधितावर नगरपालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे इतर अतिक्रमण धारकांचे लक्ष लागले आहे. या टपरी धारकाच्या पाठीमागे कोणाचातरी राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-- दोन दिवस अतिक्रमण मोहीम स्थगित --
गुरुवारी सकाळी संभाजी चौकातील एका व्यापाराचे अतिक्रम काढताना त्याने अतिक्रमण काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केला असता या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्याला कोणती इजा होऊ नये, म्हणून बाजूला केले असता यावेळी या व्यापाऱ्याने पोलिसांनी मला मारहाण केल्याचा बनाव केला व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून घेतले त्यामुळे व्यापारी संघाचे पदाधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. स्वयंघोषित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या किरकोळ गोष्टीचा बाऊ करत व्यापाऱ्यांना एकत्र करून अचानकपणे दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला व शहरातील व्यापाऱ्यांना दुकाना बंद करण्यास भाग पाडले. 

अचानकपणे व्यापार पेठ बंद झाल्याने ग्रामीण भागातून शहरात कपडे, भांडी, दागिने, किराणा साहित्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. त्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागला आहे. दरम्यान बेकायदेशीर जमाव जमा करून व्यापारी महासंघाचे स्वयंघोषित पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये जमा होऊन संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत होते. वास्तविक पाहता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना जाणीवपूर्वक स्वयंघोषित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

-- पदाधिकांचे दुकान सुरू, इतरांचे बंद --
स्वयंघोषित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही व्यापाऱ्यांना सोबत घेऊन इतर व्यापाऱ्यांच्या ‌काना बंद केल्या मात्र या पदाधिकांच्या नातेवाईकांच्या दुकाना सुरू होत्या यामुळे इतर व्यापारामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान दोन दिवस अतिक्रमण मोहीम स्वागत केली असून रविवारी पुन्हा ही अतिक्रम मोहीम जोमाने सुरू राहील व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे नसता काही नुकसान झाल्यास यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असे मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांनी सांगितले.