फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक स्थगित

Foto
पैठण, वैजापूर येथील अनेक वार्डामधील निवडणूक स्थगिती, उमेदवारांचा झाला हिरमोड

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्ह्यात सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्यातील फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 

यासोबतच वैजापूर, गंगापूर, आणि पैठण नगरपरिषद क्षेत्रातील आठ सदस्यांच्या निवडणुकीलादेखील स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त ऋषीकेश भालेराव यांनी दिली. त्यामुळे निवडणूक लढविणार्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर या सहा नगरपरिषदा आणि फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या
ठिकाणी थेट पद्धतीने एकूण ७नगराध्यक्ष आणि १६० सदस्यांची निवड होणार होती. त्यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. परंतु मतदानाच्या दोन दिवस यातील काही ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयीन अपील प्रकरणांचे निकाल प्राप्त झाल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतला. 

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री उशीरा निवडणूक स्थगितीचे आदेश जारी केले. यात वैजापूर येथील प्रभाग क्रमांक १ अ आणि २ ब, गंगापुरातील प्रभाग क्रमांक ४ ब आणि प्रभाग क्रमांक ६ ब. पैठण येथील प्रभाग क्रमांक ३ अ, ६ अ. ६ ब आणि ११ ब मधील निवडणूक स्थगित केली आहे. तर फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूकच रद्द केली गेली आहे. 

स्थगिती नसलेल्या ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर स्थगिती दिलेल्या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, ऐनवेळी निवडणूक स्थगित झाल्याने संबंधित प्रभाग आणि वॉर्डातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. शिवाय आतापर्यंतच्या खर्चावरही पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.