औरंगाबाद- आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या डी फार्मसीफच्या विद्यार्थ्यांपैकी एकाची प्रकृती काल सायंकाळी खालावली. सदर विद्यार्थ्यास तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून, प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल न घेतल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
केमिकल फार्मासिस्ट पदाची निर्मिती करावी. त्याचबरोबर मानधन
देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी डी फार्मसीफचे २० ते २५ विद्यार्थी १ जानेवारीपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर
उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी संतप्त
झाले आहेत. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
घेत आपले प्रश्न मांडले. त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही. गेल्या
पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाने विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर गंभीर
परिणाम झाला आहे. शनिवारी सायंकाळी रामप्रसाद नागरे या विद्यार्थ्याची प्रकृती
अचानक खालावल्याने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून
त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रामप्रसादची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे घाटी
प्रशासनाने सांगितले. दरम्यान, न्याय मिळेपर्यंत
उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला आहे.