बापाने पोटच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून मारले; कन्नड तालुक्यातील रामपूरवाडी येथील घटना

Foto
औरंगाबाद: ही मुलगी तुझी नाही, ती दुसऱ्याची आहे असे आई ने मुलाला म्हणताच मुलाने पोटच्या चिमुकलीला जमिनीवर आदळून ठार मारल्या ची घटना कन्नड तालुक्यातील रामपूरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगा व आईला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

 खुशी बाबासाहेब जंजाळ (वय ४ महिने) राहणार रामपूरवाडी ता. कन्नड असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, बाबासाहेब जंजाळ या तरुणाचा सहा वर्षांपूर्वी फुलंब्री तालुक्यातील बाभुळगाव येथील वैशाली सोबत विवाह झाला होता. मोठ्या थाटामाटात विवाह झाल्यानंतर दोन वर्षांनी वैशालीला सासरच्या मंडळीने या ना त्या कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी घरात किरकोळ कारणावरून वैशाली व बाबासाहेब मध्ये वाद झाला. या वादात वैशालीने बाबासाहेब विरुद्ध पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले असता न्यायालयाने पाच महिन्यापूर्वी वैशालीला सासरी नांदवण्याचे आदेश दिले होते. एका महिन्यापूर्वी चिमुकलीला घेऊन वैशाली सासरी गेली. सोमवारी सायंकाळी किरकोळ वादातून मोठ्या प्रमाणात वाद झाला. यावेळी बाळासाहेबाची आई लतिकाबाई हिने ही मुलगी तुझी नाही ही दुसऱ्याची आहे तिला ठार मारून टाक असे म्हणताच बाबासाहेबांनी चिमुकलीला घेऊन जमिनीवर जोराचे आपटले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. वैशालीने धावपळ करून जमिनीवर पडलेल्या चिमुकलीला तात्काळ शेजारच्यांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.