छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पहिला केंद्रीय लोककला महोत्सव ११ व १२ जानेवारी रोजी होणार आहे. यामध्ये चार रंगमंचावर ११ कलाप्रकार सादर होणार असून ३७७ कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी स्वतंत्र लोककला महोत्सव घेण्याचे गेल्या वर्षीच्या युवक महोत्सवात घोषित केले. त्याप्रमाणे यंदाच्या केंद्रीय युवक महोत्सवात लोककला वगळून बाकी कलाप्रकार येण्यात आले. २७ ते २९ सप्टेंबर या काळात झालेल्या युवक महोत्सव ४८७ पैकी २६३ महाविद्यापीठांचे संघ सहभागी झाले. यानंतर आता दुसर्या टप्प्यात ११ व १२ जानेवारी रोजी केंद्रीय लोककला महोत्सव विद्यापीठ परिसरात होणार आहे. सदर महोत्सवासाठी महाविद्यालयांचा सहभाग ऐच्छिक असणार आहे. संलग्नित ६३ महाविद्यालयांनी १० ते २० डिसेंबर या काळात नावनोंदणी केली.
लोककला महोत्सवाचे उद्घाटन व समारोप समारंभ विद्यापीठाच्या नाटयगृहात कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. प्रख्यात कवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या हस्ते रविवारी (दि.११) सकाळी ९: वाजता होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.गौतम पाटील, संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर याच ठिकाणी सोमवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ होईल. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख, प्रख्यात रंगकर्मी डॉ.गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम, डॉ.योगिता होके पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवास युवा कलावंतासह रसिकांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे.















