मुलगी वाचली पण तिला वाचवायला गेलेले ५ जण बुडाले,...

Foto
हैद्राबाद - आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी जे घडलं, ते शौर्य, माणुसकी आणि दुर्दैवी घटनेची हृदयद्रावक कहाणी आहे. याठिकाणी एक अल्पवयीन मुलगी तुंगभद्रा नदीत पडली होती, तिला वाचवण्यासाठी ५ जणांनी नदीत उडी घेतली. मात्र पाण्यात बुडून या पाचही जणांचा मृत्यू झाला आणि ती मुलगी सुखरूप बचावली. पाण्यात बुडणारे लोक आसपासच्या गावातील रहिवासी असून रेस्क्यू टीमकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

अधिक माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. मंत्रालयम परिसरात वाहणारी तुंगभद्रा नदी किनारी काही लोक फिरत होते. त्यावेळी एक अल्पवयीन मुलगी नदी किनार्‍यावर तिचे पाय धुवत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती नदीत पडली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ती मुलगी वाहू लागली. नदीत बुडणार्‍या मुलीला पाहून परिसरात गोंधळ उडाला. कुणाकडेही विचार करण्याचा वेळ नव्हता. मुलीचा जीव धोक्यात होता तिला वाचवण्यासाठी काही लोकांनी नदीत उडी घेतली. परंतु त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

या मुलीला वाचवण्यासाठी आधी एका व्यक्तीने नदीत उडी मारली. त्यानंतर दुसरा, तिसरा आणि पाहता पाहता पाच जणांनी तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. अखेर त्या मुलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले परंतु नदीचा वेगवान प्रवाह ५ जणांना भारी पडला. ज्या लोकांनी मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला, त्यांना नदीचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. काही क्षणातच हे ५ जण वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांनी किंकाळ्या फोडल्या. ज्या मुलीला वाचवण्यासाठी ५ जण नदीत उतरले, ती मुलगी तर वाचली परंतु या ५ जणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. हे मृतक आसपासच्या गावातील रहिवासी आहेत. या दुर्घटनेनंतर  च्या पथकाला पाचारण करण्यात आले. नदीत सर्च ऑपरेशन करून बुडणार्‍या ५ जणांचा शोध घेतला जात आहे. नदीतील पाण्याची वाढलेली पातळी आणि जोरदार प्रवाह लक्षात घेता प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नद्या, कालवे आणि जलाशयांना भेट देताना विशेष खबरदारी घ्यावी आणि मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये असं प्रशासनाने म्हटलं आहे.