नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाची एकी झाली होती. परंतू, या दोघांना मिळून काही केल्या भाजपचा झंझावात रोखता आला नाही. दोन्ही महापालिकांत बहुतांश जागांवर या दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवारच दुसर्या क्रमांकावर राहिले आहेत. अशातच येती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक देखील एकत्र लढण्यासाठी बारामतीत बैठका झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी सर्वोच्च न्यायालयात चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत सेटलमेंट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीय.
पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत रणनीतीवर शिक्कामोर्तब केले. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील काही तालुक्यांत आम्ही मित्रपक्षांसोबत एकत्रित लढणार आहोत, तर काही ठिकाणी स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले.
आज झालेल्या बैठकीला जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार उपस्थित होते. यावेळी रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह असून अनेक तालुक्यांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.
चिन्हाचा पेच कायम: उद्या महत्त्वाची सुनावणी
निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे, यावरून सध्या संभ्रम आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, कोणते चिन्ह घ्यायचे, याचा अंतिम निर्णय स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार घेतला जाईल. चिन्हाबाबत उद्या (मंगळवारी) संध्याकाळी न्यायालयात/निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीनंतरच अधिकृत चित्र स्पष्ट होईल.
गुप्त रणनीतीवर भर
निवडणुकीच्या चक्रव्यूहाबाबत विचारले असता, पवार यांनी सावध पवित्रा घेतला. निवडणुकीची रणनीती ही मीडियासमोर जाहीर करायची गोष्ट नसते. वेळ येईल तेव्हा आमची ताकद मैदानात दिसेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. पुण्यातील या बैठकीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.