पाणी प्रश्नचा मतदानावर जाणवणार का प्रभाव ? पाणीप्रश्‍नावरून गेल्या काही दिवसात सातत्याने आंदोलने

Foto
 
औरंगाबाद :  गेल्या काही महिन्यांपासून शहराचा पाणीप्रश्न पेटला असून, सिडको-हडकोसह वा अन्य काही वसाहतींमध्ये तर आठ दिवसांआड पाणी येत आहे. पाणीप्रश्‍नावरून विविध ठिकाणी सातत्याने छोटी-मोठी आंदोलने पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा तर ही आंदोलने अतिशय तीव्र, आक्रमक पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान युतीच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी नागरिकांनी याचा जाबही विचारला.सर्वत्र निवडणुकीचा माहोल असतानादेखील नागरिक पाणी-पाणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानावर या पाणी प्रश्नाचा प्रभाव जाणवणार काय? अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून शहराचा पाणी प्रश्न अक्षरशः पेटलेला असून, या पाणी प्रश्नावरून गेल्या काही दिवसात मनपा मुख्यालय, पाणी टाकी, आदी विविध ठिकाणी सातत्याने आंदोलने पाहायला मिळत आहेत. यात टँकर आडवणे,आंदोलने, मोर्चे, आदी विविध आंदोलने पाहायला मिळाले. रविवारी आठ दिवसानंतर देखील पाणी न मिळाल्याने सिडकोतील नागरिकांनी जलकुंभ गाठले होते. सिडको-हडकोसह अन्य काही जुन्या वासहतीतही आठ दिवसआड पाणी येत आहे. त्यानंतर देखील कमी दाबाने व रात्री-बेरात्री केव्हाही पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पाणी प्रश्नामुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांना सिडको परिसरासह ठीक-ठिकाणी  नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. त्यामुळे या पाणी प्रश्नचा या मतदानावर प्रभाव जाणवणार काय? अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.