सभापतीपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव, सवंदगाव गणावर प्रमुख पक्षांचे लक्ष
वैजापूर : पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत सभापतीपद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे सवंदगाव पंचायत समिती गणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांनी या ठिकाणी ताकद पणाला लावली आहे. निवडणुकीत विजयी होणारी सवंदगाव गणातील महिला वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान होण्याची संधी आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यात लक्षवेधी ठरत आहे ते पंचायत समिती सभापती पदाचे उमेदवार. कारण यंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आले असून, सवंदगाव हा पंचायत समिती गणदेखील अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे. त्यामुळे पंचायत समिती गण निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
येथील निकालावरच पंचायत समितीच्या नेतृत्वाचा चेहरा ठरणार आहे. त्यामुळे या गणातून निवडून येणाऱ्या महिला उमेदवाराकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवंदगाव गणात राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांनी या गणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पंचायत समिती वर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सभापती पदाचे आरक्षण हे अनु. जाती महिलांसाठी राखीव असल्याने सर्वच पक्षांकडून उमेदवार विजयासाठी फिल्डिंग लावली जात आहे. या गणातून ४ महिला निवडणुक रिंगणात आहेत. त्यात उद्धव सेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी शप, वंचीत आघाडी दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. उद्धव सेनेच्या अंजली जगताप, शिंदे सेनेच्या वंदना शिंदे, राष्ट्रवादी शप च्या आरती त्रिभुवन व वंचीत आघाडीकडून पुजा त्रिभुवन निवडणुक लढवत आहेत. तर भाजपने आचल बागुल यांना पाठिंबा दिला आहे.











