मुंबई : कल्याण डोंबिवलीनंतर महापालिकेत दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपाला पनवेलमध्येही निकालाआधीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली. भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज छाननीमध्ये त्यांच्या प्रभागातून दाखल करण्यात आलेला अर्ज बाद झाला. त्यामुळे येथील निकाल स्पष्ट झाला. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी एका जागेचा निकाल मतदानाआधीच स्पष्ट झाला आहे.
पनवेल महानगरपालिकेत भाजपाने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहे. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते.
भाजपासाठी निवडणूक सोपी?
पनवेलमध्ये भाजपाने महाविकास आघाडीवर कुरघोडी करीत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडले. त्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पनवेल शहर, नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपाला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन उमेदवार बिनविरोध
भाजपाच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक २६-क मधून आसावरी नवरे या दोन्ही उमेदवार बिनविरोध नगरसेवक म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे निकालाआधीच तीन नगरसेवक निश्चित झाले आहेत.