नागरिकांनी परिसरात खाजगी वाहने उभी करू नका : आगार प्रमुख
गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूर शहराला जोडणारा एसटी बसस्थानकाचा मुख्य रस्ता काही दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. बसस्थानकात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांचे हाल होत होते.
या समस्येची दखल घेत नगरसेवक अख्तर सय्यद आणि सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बंद करण्यात आलेला मुख्य रस्ता अखेर मोकळा करण्यात आला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्ता खुला झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधितांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. बसस्थानक परिसरातील वाहतूकही सुरळीत झाली आहे. प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
गंगापूर बसस्थानकाचा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आम्ही संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. नागरिकांच्या हितासाठी हा रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने सकारात्मक दखल घेत रस्ता मोकळा केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम तत्पर राहू.
- अख्तर सय्यद, नगरसेवक
बसस्थानकाच्या मुख्य रस्त्यावर काही नागरिकांकडून खाजगी वाहने उभी केली जात असल्यामुळे एसटी बसच्या ये जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता मुख्य रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांनी बसस्थानक परिसरात खाजगी वाहने उभी करू नयेत, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वांच्या सहकार्यामुळे एसटी सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता ये ईल.
- विजय बोरसे, आगार प्रमुख,













