आईनेच काढला पोटच्या मुलाचा काटा

Foto
शिल्लेगावच्या थरारक खून प्रकरणाने परिसर हादरला , मित्र,  जावयाच्या मदतीने निघृण हत्या; मृतदेह विहिरीत टाकला

गंगापूर, (प्रतिनिधी) एक आई आपल्या पोटच्या पोराचीच खुनी ठरेल, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आलेल्या या थरारक खूनप्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मराठवाड्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एकभुर्जी वाघलगाव (शहानवाजपूर) शिवारातील कर्नावट यांच्या शेतातील विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील या व्यक्तीचे हात पाय दोरीने बांधलेले, संपूर्ण शरीर पांढऱ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले व दगड बांधून विहिरीत फेकलेले असल्याचे आढळून आले. खून इतका निर्दयी होता की पाहणाऱ्यांचेही काळीज सुन्न झाले. अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--  तांत्रिक तपासातून धक्कादायक सत्य उघड  ---
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार तपासाला वेग देण्यात आला.  अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाचे मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास, गुप्त माहिती व फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

सुरुवातीला कोणतीही बेपत्ता तक्रार नसल्याने तपास गुंतागुंतीचा झाला. नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याने संशय अधिक बळावला. अखेर संशयावरुन मयताच्या आईचे डीएनए नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीस पाठवले. आणि अहवाल आला. मृतदेह तिच्याच मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले.

-- आईच निघाली सूत्रधार --
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयताच्या आईनेच तिचा जिवलग मित्र गोरख शेकू आहिरे (रा. एकभुर्जी वाघलगाव) आणि जावई कमलसिंग साहेबसिंग सिंगल (रा. टाकळीवाडी) यांना मुलगा आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले. 

इतकेच नव्हे तर, तिने थेट शब्दांत त्याला संपवण्याचा आदेश दिला आणि त्यासाठी पैशाचे आमिषही दिले. खुनाची थरारक योजना २३ जानेवारी रोजी आरोपींनी मयतावर पाळत ठेवली. त्याला पोटुळ रेल्वे स्टेशनवरून बोलावून, दारू पाजली आणि नंतर लोखंडी रॉडने निघृण मारहाण करून ठार केले. खून केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला.

-- आरोपी गजाआड ---
पोलिसांची मोठी कामगिरी या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व त्यांच्या पथकाने केली.

--- आईच आरोपी, मित्र व जावई जल्लाद ---
ही घटना केवळ खून नसून समाजाला हादरवून सोडणारी आहे. शिल्लेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.