बीएमसीमध्ये मविआ फुटली ! काँग्रेसने घेतला मोठा निर्णय ! स्वबळाचा नारा

Foto
मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना उर्जितावस्था देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

वडेट्टीवार यांनी म्हटले की, काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरणार असली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना-ठाकरे गटाकडून किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल.फफ त्यांच्या वक्तव्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षांची आगामी रणनीती कशी असणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेवरील सत्ता परत मिळवण्यासाठी शिवसेना-ठाकरे गट प्रयत्नशील आहे. दुसरीकडे काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय ही समीकरणे बदलू शकतो, अशी देखील चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवताना ठाकरे गटाला काँग्रेसची मते फिरली. मात्र, काँग्रेसला ठाकरे गटाची मते मिळाली नसल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला होता. त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत थेट मनसेच्या एन्ट्रीची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी देखील काँग्रेस नेत्यांनी मविआमध्ये चौथा पक्ष सहभागी होणार नसल्याचे संकेत दिले होते.

ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा?

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीमध्ये काँग्रेसचा अडसर असल्याची चर्चा होती. मनसेने याआधी घेतलेल्या भूमिकांना काँग्रेसचा आक्षेप होता. आता मात्र, काँग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा होणार आहे.  विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, आम्ही हायकमांडबरोबर चर्चा केली. त्यानंतर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्षाचा प्रस्ताव आल्यास, त्यावर चर्चा नक्की होईल. शरद पवारांकडून चर्चेचा प्रस्ताव आला, तर त्यावर आम्ही चर्चा करू, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, मुंबई महापालिकेत आमच्या काही जागा निवडून येत असतात. त्याशिवाय, महायुतीमधील तिन्ही पक्षही स्वबळावर निवडणूक लढवू शकतात. त्यांच्या मतांचे विभाजन होत नाही, मग आम्ही आमच्या मतांच्या विभाजनाची चिंता का बाळगावी असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.