जिल्हा परिषद, पंचायत समितीचे निवडले जाताहेत कारभारी, किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान

Foto
मुंबई : राज्यातील प्रमुख १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी  आज मतदान होत आहेत. यापूर्वी या निवडणुकांचे मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार होते. पण, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे मतदान २ दिवस पुढे ढकलण्यात आले होते. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतही मतदान होत आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा या यादीत समावेश आहे. या निवडणुकांसाठी दुपारपर्यंत  ३०.०६ टक्के पर्यंत मतदान झाले. 


राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत असून यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२  जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७,४३८ उमेदवार रिंगणात असून २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत. आजच्या मतदान प्रक्रियेत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. तर राज्यात विविध ठिकाणी मंत्री, विविध पक्षाचे नेते यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
 
काही ठिकाणी राडा, पोलिसांचा हस्तक्षेप

छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मतदान केंद्रावर विनाकारण  महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान मोठा राडा झाला. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्रिंबक पाटील गव्हाणे हे मतदान केंद्राची पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेनंतर नानेगाव परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धक्काबुक्कीच्या या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवडणुकीच्या शांततामय वातावरणात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.