अन अधिकाऱ्यावरच उगारला दंडा !

Foto
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार
पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी घाईघाईने जाणाऱ्या एका अधिकाऱ्याला गेटवर अडवून पोलिसांनी चक्क दंडा उगारल्याने एकच गोंधळ उडाला. सदर अधिकार्‍याने ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी हमरीतुमरी केल्याची तक्रार या अधिकाऱ्याने केली आहे.
 जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. पालकमंत्री येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. कार्यालयात जाणाऱ्या दोन्ही गेटवर पोलीस अधिकार्‍यासह आठ ते दहा स्पेशल गार्ड तैनात करण्यात आले होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आपत्ती निवारण कक्षातील एक अधिकारी कर्तव्यावर जात होते. पोलिसांनी त्यांना अडवले. सदर अधिकाऱ्याने ओळखपत्र गळ्यात अडकवले होते. मात्र तरीही पोलिसांनी त्यांना अडवले आणि हमरीतुमरी केली. तसेच एका पोलिसाने दंडाही उगारल्याचा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे.
मी आता मीटिंगमध्ये जाणार नाही !
दरम्यान पोलिसांच्या या वागणुकीने संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने पोलिसांच्या दांडेलशाहीवर नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इरादा सांजवार्ता प्रतिनिधीशी बोलून दाखवला. आता मी बैठकीलाच जाणार नाही, असे तो अधिकारी म्हणाला.