पोलिस उपायुक्तांच्या घरातून ८ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरणार्‍यास अटक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घरातील नोकराने  पोलीस उपायुक्तांच्या घरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

१३ जानेवारी रोजी मनीषा कॉलनी, अदालत रोड येथील बंगल्यात हा प्रकार समोर आला. १८ जानेवारी रोजी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नोकराला अटक करण्यात आली. सुमित सुभाष निंदाने (३०, रा. नंदनवन कॉलनी), असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. उर्मिला सुभाष घारगे (६७, रा. विश्रामबाग, सांगली) या फिर्यादी आहेत. त्यांच्या कन्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर  पोलीस उपायुक्त आहेत. त्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या बंगल्यात कुटुंबीयांसह भाड्याने राहतात. ३० डिसेंबर २०२५ रोजी उर्मिला या काही दिवस मुलगी डीसीपी शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्याकडे राहण्यासाठी आल्या. ६ जानेवारी रोजी दुपारी त्यांनी सोन्याच्या ८ तोळ्यांच्या बांगड्या बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये एका प्लास्टिक डब्यात ठेवल्या. पैसे पर्समध्येच होते. १३ जानेवारी रोजी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात ४ हजार रुपये कमी दिसले. मात्र, पैसे खर्च झाले असतील किंवा दुसरीकडे ठेवले असतील, असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. दोन-तीन दिवसांत गावी जायचे असल्याने १६ जानेवारीला त्यांनी सोन्याच्या बांगड्या पाहिल्या असता त्याही गायब होत्या. त्यानंतर घरात शोधाशोध केली. मात्र, ८ तोळ्यांच्या बांगड्या कुठेही सापडल्या नाहीत. बांगड्याचे बाजारमूल्य किमान १० ते १२ लाख आहे. वेदांतनगर ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल  करण्यात आला असून पोलिसांनी सुमितला अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी करीत आहेत.