जिजाऊ घाटासाठी गरिबांच्या रोजी रोटीवर फिरवला नांगर

Foto
मच्छीमारांनी फोडला टाहो. निर्दयी प्रशासनाला फुटला नाही पाझर

पैठण, (प्रतिनिधी): गागाभट्ट चौक परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर करण्यात येणाऱ्या जिजाऊ घाटासाठी या ठिकाणी अनेक वर्षांपासून भाजीपाला विकून व मासेमारी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांची रोज रोटी त्यांच्या उभ्या पिकात जेसीबी फिरवून हिसकावून घेण्यात आली असल्याने या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या गरीब मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.

सुमारे वीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी जिजाऊ घाट निर्माण करण्यात येणार आहे. परंतु घाट बांधकामासाठी चुकीची जागा निवडण्यात निवडण्यात आली असून गोरगरीब मच्छीमारांचे संसार उध्वस्त करण्यात आले आहे.
दोन नाल्यातून शहराला पुराचा धोका नाथ सागर जलाशयातून एक लाख पेक्षा जास्त क्षमतेने पाणी सोडण्यात आल्यावर गागाभट्ट चौकातील व गंगेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या नाल्यातून पुराचे पाणी कहार गल्ली, परदेशीपुरा या भागात शिरते त्यामुळे नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या दोन्ही नाल्याच्या जागेवर सदरील घाट बांधले असते तर पुरापासून शहराला संरक्षण मिळाले असते.

 परंतु काही राजकारणी लोकांनी जाणीवपूर्वक या घाटाची जागा बदललेली आहे. सोमवारी तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलीस बंदोबस्तात चार जेसीबी द्वारे या नागरिकांनी लावलेले वांगी, मिरची, शेवगा भाजीपाला, आळूची पाने मेथी, भोपळा, डांगर आदि झाडे नष्ट करण्यात आली आहे. आपल्या डोळ्यासमोर आपली रोजी रोटी नष्ट करत असल्याचे पाहून या मच्छीमारांनी टाहो फोडला होता.

 परंतु प्रशासनाला दयेचा कोणताही पाझर फुटला नाही. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे, सारंग व श्रीमती सांगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पूर्ण अतिक्रमण हटवल्याशिवाय ही मोहीम थांबणार नसल्याचे तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले.