मुंबई: मान्सूनचे आगमन १५ जून रोजी कोकणात झाले असले तरी अद्याप मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागात दाखल झालेला नाही. आज, शनिवारी २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बर्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले.
मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोलीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा लागलेली होती. जी आता संपली आहे येत्या दोन ते तीन दिवसात आणखी पाऊस पडेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. गेल्या १७ दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट सगळेचजण बघत आहेत. मराठवाड्याला दुष्काळाचे सर्वाधिक चटके बसल्याने या भागातले शेतकरीही पावसाची वाट बघत होते आणि अखेर वरूणराजाने बरसण्यास सुरूवात केलेली आहे.
शुक्रवारी बीड, परभणी, उस्मानाबाद या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे वातावरणातला उकाडा दूर झाला आहे. तसेच शेतकरी आणि सामान्य नागरिक यांना दिलासा मिळाला आहे.
बीडमधल्या करपरा नदीचे रूप एका पावसात बदलले आहे. या नदीची पुजार्यांकडून आज पूजा करण्यात आली. काल रात्रीपासूनच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या चारही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. सकाळी काही वेळ पावसाने उघडीप दिली होती मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच पावसाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. बळीराजाच काय तर सगळे लोकही चातकासारखी पावसाची वाट पहात होते अखेर सतरा दिवसांनी चांगला पाऊस झाला आहे