मुंबई : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. हे महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयकांच्या नावाखाली डीलिमिटेशन बिल लादण्याचा सरकारचा डाव आहे. त्यासाठी खासदार विकत घेतले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक खासदारांसाठी १५० कोटी रुपयांचा भाव लावला आहे. हे व्यवहार ठरवण्यासाठी प्रत्येक राज्यात एजंट नेमले आहेत. महाराष्ट्रात झारखंड आणि आंध्रप्रदेशातील दोन खासदारांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
हे महिला आरक्षण विधेयक नाही. तर त्या नावाखाली मतदारसंघ पुनर्चना बिल लादण्याचं कारस्थान आहे. ५४० खासदारांच्या जागी ८५० ते ८६० खासदार लोकसभेत कोंबण्याचा खटाटोप आहे. २०२९ला भाजपचा पराभव होणार आहे, त्यामुळे परत सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा हा डाव आहे. आतापर्यंत हे लोक ईव्हीएम आणि व्होट चोरीचा वापर करून विजयी झाले. त्यात त्यांचा भांडाफोड झाल्याने डीलिमिटेशनच्या माध्यमातून आपल्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडायचे आणि २०२९ ला सत्तेत यायचं आणि परत जायचंच नाही, असा त्यांचा डाव आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ते गद्दार ठरतील
२०२६मध्ये त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. मोठ्या फरकाने बिल कोसळलं होतं. त्यानंतर संसद संस्थगित करण्यात आली. आता नवीन बिल आणत आहेत. हिवाळी अधिवेशन घेत नाहीत. खासदारांना विकत घेण्यासाठी किंवा त्यांना क्रॉस व्होटिंग करायला लावण्यसाठी १५० कोटी रुपयांचा भाव खासदारांचा ठरला आहे. जे या बिलाच्या बाजूने मतदान करतील त्यांना देश, देशाची जनता इतिहासात देशाचे गद्दार म्हणून लक्षात ठेवेल. देशाचं विभाजन होत असताना, लोकसभेचं महत्त्व कमी होत असताना, लोकांकडून सत्ता खेचली जात असताना ज्यांनी भाजप सरकारला मतदान केलं, त्यांना देशातील जनता गद्दार म्हणून लक्षात ठेवेल, असं राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे असते तर
महाराष्ट्रात झारखंड आणि एक आंध्रप्रदेशच्या भाजपच्या खासदाराची या व्यवहारासाठी नियुक्ती केली आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर अशा प्रकारचं राष्ट्रद्रोही बिल आणण्याची त्यांची हिंमत झाली नसती. शरद पवारांची प्रकृती चांगली असती तर त्यांनीही लोकशाहीचा गळा घोटू दिला नसता. काही खासदार विकायला तयार आहेत. त्यांच्यापर्यंत रकमा पोहोचल्या आहेत. आता २०२९ ला सरकारला आणायचं असल्यामुळे तिप्पट भाव लावला आहे. जे या विधेयकाच्या बाजूने मतदान करतील त्यांना १५० कोटी मिळाले हे समजून घ्यावं. १५० कोटी घेतल्याशिवाय कोणीही मतदान करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
संपर्क सर्वांशीच होतो
या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंना संपर्क साधला का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संपर्क सर्वांशीच होत असतो. पण उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आणि परखड आहे. आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे आहोत. ज्या मोदी आणि शाह यांनी आमचे पक्ष फोडले. त्यांना पाठिंबा कसा द्यायचा याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, त्यांनी आमचा पक्ष फोडला. अशा लोकांच्या समर्थनार्थ कसं उभं राहता येईल? असा सवालही त्यांनी केला.