मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री उपोषण मागे घेतलं आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी काल (३० मे) सकाळी १० वाजतापासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यानंतर काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री १.१५ वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं.
मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासन दिली आहेत, ती सर्व तुमच्या समोर (माध्यमांसमोर) दिली. कोणतेही आश्वासन मागे दिलेलं नाही. आम्ही दिलेली आश्वसनं मनोज जरांगे यांनी देखील वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला- राधाकृष्ण विखे पाटील
अनेक विषय राज्य सरकारकडून मान्य झाले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसेच मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. त्याच्यावर आता लगेच आम्ही पुढच्या दोन-तीन दिवस शासन निर्णय काढून सुरुवात करणरा आहोत.
मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?
५८ लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार
नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार
जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त १५ दिवसांत बैठक घेणार
सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एक महिना वेळ
न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ
प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन
आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे-पाटलांचीही स्वतंत्र हेल्पलाईन
मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार
बबनराव तायवाडे काय म्हणाले?
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं, त्यांच्या मागण्यांना घेऊन राज्य सरकार दोन दिवसात शासन आदेश काढणार आहे. मात्र आमच्या संविधानिक आरक्षणाला धक्का लागणार नसल्याने आम्ही आश्वस्त असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याचा पुनरुचार केला की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, एका समाजाला न्याय देण्यासाठी दुसर्या समाजावर अन्याय करणार नाही. या सरकारच्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अभिंनदन देखील केल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
लक्ष्मण हाके काय म्हणाले?
मनोज जरांगेचं आंदोलन एक दिवसाची एकांकिका होती. मनोज जरांगे बिहार चित्रपटातील रीलस्टार आहे. मनोज जरांगेंना राजकारणाचे वेध लागले आहेत. प्रसाद लाड यांच्या मदतीने त्यांना पक्ष स्थापन करून विजय थलपती व्हायचे आहे. आज महाराष्ट्र सरकार लाचार होताना पहिले. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना ओबीसी जागा दाखवणार, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली.