पावसाची माघार नाहीच, मराठवाड्यात पुन्हा बरसणार !

Foto
 पुणे : महाराष्ट्रात मान्सूनने माघार घेतली असली तरी ऐन दिवाळीत खराखुरा पाऊस कोसळतोय. मराठवाड्यातील हवामानात देखील मोठे बदल जाणवत असून कुठे कोरडे हवामान तर कुठे पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव परिसरात आज पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत ढगाळ हवामान राहील. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, आणि हिंगोलीत तापमानात मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणी आज कोरडं हवामान राहणार असून उकाडा जाणवेल. सोमवारपासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. 20 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही.

दरम्यान, ऐन दिवाळीत मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. त्यामुळे मराठवाडाकरांची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा अवकाळी पाऊस सक्रीय होत असून 21 ऑक्टोबरला काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.