सागर प्रकाशनचे साजवार्ता
Page No.: 8 Date: 28/11/2026
संवाद बैठकीत मोकळेपणाने चर्चा; कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरही घेणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिन्नू पी.एम. आणि कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी संवाद बैठक पार पडली. कडक शिस्तीमुळे बैठकीत किंवा फायली घेऊन आल्यावर सीईओ झापतात, यावरून निर्माण झालेला विसंवाद या बैठकीतून दूर झाल्याचे चित्र आहे.
अभ्यासपूर्ण फाइल नसल्यास सीईओ रागावतात, या भीतीपोटी काही कर्मचारी त्यांच्या दालनात जाण्यास कचरत होते, तर काहींनी सुटीचा मार्गही निवडला होता. या वादाचे पडसाद अध्यक्षांच्या दरबारापर्यंतही
उमटले होते. दरम्यान, संवाद बैठकीत एका महिला कर्मचाऱ्याने मॅडम, आम्हाला तुमची भीती वाटते, त्यामुळे समोर येण्याची हिंमत होत नाही, अशी भावना मोकळेपणाने मांडली.
त्यानंतर गप्पा रंगत गेल्या आणि गैरसमज दूर होण्यास मदत झाली.
वेतन एकाच बँकेत होणार
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी कर्मचारी युनियनला कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काही सूचना केल्या. सर्वांचे वेतन एकाच बँकेत जमा करून त्याद्वारे विमा उतरवण्याबाबत आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तसेच, आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आणि एक हजार रुपये कपात करून त्याचा विनियोग कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















