उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मातोश्रीवर सुरु आहेत चर्चेच्या फैरी

Foto
मुंबई : मनसे आणि उद्धवसेना यांच्यातील जागावाटपात काही जागांमध्ये आदलाबदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्ही जागा वाटपाची घोषणा करू, अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली. राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अद्यापही जागावाटपावर खल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जागांवर अजूनही तिढा कायम असून, मातोश्रीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. 

ठाकरे बंधूंनी अधिकृतपणे युती जाहीर केली असली, तरी उद्धवसेना आणि मनसेतील जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल, हे जाहीर झालेले नाही. जागावाटपावरून उद्धवसेना आणि मनसेत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. या बैठकीत नेमके काय झाले, जागावाटपाचा तिढा कधी सुटणार, याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली .

मातोश्रीवर बैठक झाली, आता राज ठाकरेंशी चर्चा करणार

मातोश्रीवर आम्ही आलो होतो. काही जागांमध्ये आदलाबदल करण्याचा विषय होता. त्यावर चर्चा झाली आहे. परंतु, यावर पुन्हा चर्चा करणार आहोत. चर्चेअंती आम्ही अंतिम निर्णयावर येऊ आणि जागावाटपाची घोषणा करू. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि मी असे आम्ही तिघे चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर आलो होतो. आता आम्ही पुन्हा राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. 
दरम्यान, शिवडी, विक्रोळी, माहिम, भांडूप या ठिकाणच्या जागांबाबत मतभेद असल्याच्या चर्चांवर बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, युतीच्या चर्चांमध्ये काही जागा द्याव्या लागतात आणि काही जागा घ्याव्या लागतात. देवाण-घेवाण होत असते. आम्ही आमच्या अनुभवाने युतीची वाटाघाटी करत आहोत. त्या प्रमाणे जेवढ्या जागा आमच्या पदरात पाडून घेता येतील तेवढा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले.