फटाक्यांच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते, कुणी विरोध केला तरी सण-उत्सव थांबणार नाहीत : मोहन भागवत

Foto
नागपूर : पूर्वीच्या काळात फटाके रासायनिक पदार्थांपासून तयार केले जात नव्हते. त्यांच्या धुरामुळे कीटकांचा नाश होण्यासह वातावरण शुद्ध होण्यास मदत होत होती. यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सण-उत्सवांमुळे समाज चैतन्यशील राहतो. काही जणांनी विरोध केला तरी सण-उत्सव थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरात मंगळवारी माहेश्वरी पंचायतच्या वतीने आयोजित दिवाळी कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीच्या परंपरांमागील शास्त्रीय कारणांचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, पूर्वी तुपाचे आणि तेलाचे दिवे लावले जात असत. त्यामुळे वातावरणात एक विशिष्ट प्रकारची सकारात्मकता निर्माण होत असे. या परंपरांचे पालन करताना त्यामागील विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. अशा प्रथांमुळे वातावरण शुद्ध राहण्यासोबतच जीवनात आनंदही निर्माण होतो.

सणांचे मूळ स्वरूप जपणे आवश्यक
भारतीय समाजाच्या जडणघडणीत सण-उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. अनादिकाळापासून सुरू असलेली सण साजरे करण्याची परंपरा पुढेही कायम राहणार आहे. मात्र, सण त्यांच्या मूळ आणि शुद्ध स्वरूपात साजरे केले पाहिजेत. त्यातून मिळणारे लाभ समाजाला मिळत राहणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्ती, समाज आणि संपूर्ण मानवजातीचे पर्यावरणासह संरक्षण होऊ शकते, असे भागवत म्हणाले.

अमेरिका, ब्रिटनच्या संसदेतही दिवाळी
दिवाळीला आता जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त होत असल्याचे भागवत यांनी नमूद केले. पूर्वी दिवाळी प्रामुख्याने भारतात साजरी केली जात होती. आता अमेरिका आणि ब्रिटनच्या संसदेतही दिवाळी साजरी केली जात आहे. भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची भावना जगभरात वाढत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक भारतीय आनंदी, स्वच्छ, पवित्र आणि सेवाभावी वृत्तीने सज्ज असतो, याची जाणीव जगाला होत आहे. सणांच्या निमित्ताने दानधर्म करणे हीदेखील भारतीय परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, समाजातील नियम आणि कायद्यांचे पालन करण्याचे आवाहनही भागवत यांनी केले. आपण ज्या घरात, समाजात आणि शहरात राहतो, तेथील नियम सर्वांसाठी असतात. प्रत्येकाचे जीवन चांगले व्हावे, या उद्देशानेच ते तयार केलेले असतात. आपल्या चुका सुधारण्याची सुरुवात प्रत्येकाने आतापासूनच करावी, असे ते म्हणाले.