दहशतवाद्यांना कधी व कशी शिक्षा द्यायची हे जवान ठरवतील ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

Foto
यवतमाळ। पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा कधी, कशी, केव्हा, कोण आणि कोणत्या प्रकारे दिली जाईल हे आमचे जवान ठरवतील, असे सांगत, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात मोदी यांच्या हस्ते घरकुलाच्या चावीचे तसेच गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी नागपुरातील अजनी ते पुणे या हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

महिला बचत गट कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मोदींनी संबोधित केले. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी धीर धरा, जवानांवर विश्‍वास ठेवा, असे आवाहन देशवासियांना केले. मोदी म्हणाले, दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे तो त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षा दिली जाईल. पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानही शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाचे दु:ख मी समजू शकतो. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल.  आम्ही सैनिकांवर गर्व आणि विश्‍वास करतो. सैनिकांमध्ये आणि खास करून ‘सीआरपीएफ’मध्ये जो राग आहे तो देशाला समजत आहे, असे सांगताना सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 एक असा देश जो फाळणीनंतर जन्माला आला, जिथे दहशतवादाला आश्रय दिला जातो तो आज दिवाळखोर होण्याचा मार्गावर आहे, तो दहशतवादाचा दुसरा मार्ग झाला आहे, अशी टीका मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केली. सन २०१४ मध्ये याच मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला येऊन गेल्याचे मोदींनी यावेळी स्मरण करून दिले. दाभडीला शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्याचे सांगून गेल्या साडेचार वर्षांत शेकडो योजनांचा शीलान्यास केल्याचे मोदी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 361 कोटींचे कर्ज आमच्या सरकारने माफ केले. महिलांना सक्षम करण्याचे काम यापुढेही सुरू राहील.  

‘मोदी गो बॅक’चे फलक
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यापूर्वी पांढरकवडा येथे ‘मोदी गो बॅक’ चे फलक झळकावण्यात आले. २०१४ मध्ये मोदी याच मतदारसंघातील दाभाडी गावात आले होते. तेथून त्यांनी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून देशातील शेतकर्‍यांना अनेक आश्‍वासने दिली होती;पण ती पाळली नाहीत, त्याच्या निषेधार्थ हे फलक लावण्यात आले. हे फलक काँग्रेसने लावल्याचे सांगितले जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker