गंगापूर येथील क्लस्टर योजनेतील रखडलेली विकासकामे, योजना पुन्हा सुरू करणार

Foto
गंगापूर (प्रतिनिधी)  : केंद्र शासनाची बहुचर्चित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी गाव समूह (क्लस्टर) योजना गंगापूर तालुक्यात अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असून काही कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांनी या सर्व कामांची तपासणी करून योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे.

या योजनेअंतर्गत वाळूज परिसरातील वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, नायगावसह एकूण पाच ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सुरुवातीला जोगेश्वरी क्लस्टर योजनाफ्फ म्हणून मंजूर झालेल्या या उपक्रमाचा उद्देश औद्योगिक वसाहतीजवळील गावांचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना, शाळा खोल्या, वाचनालय, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा आदी कामांना मंजुरी देण्यात आली होती. वाळूज येथे आश्रम शाळा ते खाम नदीपर्यंत गटार योजना राबवण्यात आली असली तरी ती अपूर्णच आहे. खाम नदी परिसरातील पाणी फिल्टर प्लांटचे कामही अर्धवट अवस्थेत आहे आणि त्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या अपूर्ण आहेत, उर्दू शाळेजवळील सार्वजनिक सभागृहाचा उपयोग झालेला नाही, तर व्यायामशाळेचा खाजगी वापर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक कामे रखडलेली असून काहींना सुरुवातही झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


क्लस्टर योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची सखोल तपासणी करण्यात येईल. कोणती कामे पूर्ण झाली, कोणती रखडली आणि कोणती सुरूच झाली नाहीत याचा तपशीलवार आढावा घेतला जाईल. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ही योजना पुन्हा गतीमान करून नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.

- बालाजी सोनटक्के
(सभापती, समाज कल्याण)