विद्यार्थी ओरडत राहिले तो काठीने मारत राहिला, पैठण बसस्थानकावरील व्हिडिओनंतर सुरक्षारक्षक निलंबित

Foto

पैठण– एसटी बसस्टॅंडवर मासिक पास काढण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाने दंडुक्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या सुरक्षा रक्षकला निलंबित करण्यात आले आहे. मात्र त्याला मारहाणीचे आदेश देणारे आगार प्रमुख आणि पास देणारा क्लर्क यांच्यावरही त्वरीत कारवाईची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण

सरकारने दुष्काळी भागातील १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा दिली आहे. दिवाळी सुटीनंतर सोमवारपासून शाळा, महाविद्यालय सुरु होत आहे. यामुळे पैठण एसटी स्टँडवर मासिक पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी काही विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु असल्यामुळे पास देणारा क्लर्क आणि आगार प्रमुख तरवडे यांनी सुरक्षा रक्षकाला शालेय विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले. आगार प्रमुखांच्या आदेशावरुन सुरक्षा रक्षकाने दंडुका हातात घेऊन सर्वच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी सुरक्ष रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे, मात्र सुरक्षा रक्षकाला विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश देणारे आगार प्रमुख तरवडे आणि क्लर्कवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मराठा महासंघाचे आतिष गायकवाड यांनी केला आहे. या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे.