तापमान २ अंशांनी वाढले, कार्बन उत्सर्जनही गंभीर समस्या ः रात्रीही कमी होईना उष्णता
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः शहराचे तापमान जवळपास ४३ अंशांवर पोहोचले आहे. जे दरवर्षीपेक्षा किमान २ ते २.५ अंशांनी जास्त आहे. या तापमान वाढीला शहरात झालेले सिमेंट रस्ते कारणीभूत असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्यातच भरमसाठ वाढलेली वाहनांची संख्या अन कमी झालेले वृक्षांचे प्रमाण याचाही हातभार तापमान वाढीला लागतोय. विशेषतः सिमेंटचे जंगल असलेल्या भागात एक ते दोन अंश तापमान जास्त आहे. सिडको परिसरात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ३८.८ एवढे नोंदले गेले तर गांधेली भागात याच वेळी ३७.४ एवढे तापमान होते.
यावर्षी सूर्य आग ओकतोय...
शहरात विक्रमी ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. भाजून काढणारे ऊन रस्ते ओस पाडतेय. शहरवासियांना पहिल्यांदाच एवढे प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः जुन्या शहर होरपळून निघाले आहे. जुन्या शहरात नव्या शहराच्या मानाने तापमान जास्त असल्याचे आकडेवारी सांगते. सिमेंटच्या घरांची गर्दी, कमी झालेली वृक्षसंपदा अन भुमाफियांनी गिळंकृत केलेल्या मोकळ्या जागा याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. जुन्या शहरात मोकळ्या जागाच उरलेल्या नाहीत. उंच उंच इमारती आणि जमीनीवर सर्वत्र पसरलेले सिमेंट तप्त होते. या उष्ण वाफा वातावरणात पसरतात अन कृत्रीम डोम तयार करतात. हे डोम थंड वारे वातावरणात शिरूच देत नाही. दिवसभर तापलेल्या या इमारती आणि रस्ते रात्री उष्ण वाफा सोडतात. परिणामी दिवसा अन रात्रीही उष्णतेचा कहर असतो.
तापमापक यंत्रणा जुनीच...
भारतीय हवामान खात्याची यंत्रणा शहरात कार्यरत आहे. चिकलठाणा भागात ३० ते ४० वर्षांपुर्वी तापमापक यंत्रणा उभारण्यात आली होती. नियमानुसार ही यंत्रणा शहरालगतच्या ग्रामीण भागात असणे आवश्यक आहे. ४० वर्षापुर्वी शहराबाहेर असलेले चिकलठाणा हवामान केंद्र आता शहरात आले आहे. त्यामुळे येथील केंद्र आता शहराबाहेर हलविण्याची वेळ आली आहे.
सिमेंटचा दुष्परिणाम...
वाढत्या सिमेंटीकरणाचा मोठा फटका पर्यावरणाला बसतो आहे. शहरात बनलेले सिमेंट रोड तापमान वाढीसाठी पोषक ठरू लागले आहेत. डांबरी रस्ते लवकर थंड होतात, सिमेंट रस्ते एकदा तापले की कित्येक तास गरम वाफा सोडतात. परिणामी रात्रीचे तापमानही वाढले आहे. दुसरीकडे फोडलेले सिमेंटचे वेस्ट मोकळी जागा मिळेल तिथे अथवा नाल्यात टाकले जाते. त्यामुळे जमिनीवरील नैसर्गिक प्रवाहही रोखले जात आहेत.
कार्बन उत्सर्जन अन सोलार यंत्रणा...
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील प्रदुषणाने शहरावर एक कृत्रिम डोम तयार झाला आहे. वाढलेली वाहन संख्या आणि वातावरणात सोडला जाणारा कार्बन डायऑक्साईड शोषला जात नाही. शहरात झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. परिणामी वाहनांनी सोडलेला कार्बन वातावरणात शोषला जात नाही. त्यामुळेही तापमानात वाढ झाली आहे. दुसरीकडे आता सोलार उर्जेचा वापर वाढला आहे. या सोलारमध्ये वापरल्या जाणार्या चिप तापतात त्यातूनही उष्णतेचे मोठे उर्त्सजन होते. झाडे नसल्याने वातावरणातील आर्दता कमी झाली, परिणामी उकाडा असह्य होत आहे.
कचरा जाळणे कधी थांबणार...
पर्यावरण अभ्यासक रूपेश कलंत्री यांनी सांगितले की, शहरात जाळला जाणारा कचरा ही एक गंभीर समस्या आहे. उन्हाळ्यात जमीनीवर मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा पडतो. घराच्या परिसरात अथवा सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा सरळ पेटवून दिला जातो. महापालिकेची यंत्रणाही त्यातच धन्यता मानते. यामुळे उष्णता वाढतेय. दुसरीकडे सिमेंटचे वेस्ट टाकण्यासाठी जागा नाही. हे तोड फोड मटेरिअल थेट नाल्यात अथवा पाणी वाहते त्या जागेत टाकले जाते. त्यामूळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. सिमेंट रोड ही अतिशय घातक संकल्पना असून पर्यावरणाला हानी पोहोचविणारी आहे. सिमेंट रस्ते तयार करणेच थांबविले पाहिजे.
सावलीत उभे राहायला झाडेे कुठे? : डॉ.किशोर पाठक
सध्या उष्णतेचा चांगलाच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेत. सध्या शहरातील हरिक्षेत्र अंत्यत कमी आहे. त्यामुळे सावलीत उभे राहण्यासाठीही झाडे उरली नाही. डोंगर पोखरले गेले. त्यामुळे आता झाडेही उरले नाहीत. मागे लातूरला पाणी नेण्याची वेळ आली होती. आता तसेच ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी झाडे लावावे लागेल. हरितक्षेत्र वाढवावे लागेल. जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल. लोकांनी किमान पारिजातक सारखी झाडे दारासमोर लावावी. तसेच सध्या रस्त्याच्या बाजूला झाडे लावली जातात विदेशी झाडे लावतात. भारतीय झाडेच लावले गेले पाहिजे. असे वनविभाग, मानद वन्यजीवरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.













