गुवाहाटी : आसाममध्ये पुराची स्थिती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील पुरामुळे जीव गमावलेल्यांची एकूण संख्या ७५ वर पोहोचली आहे. आपत्ती अहवाल आणि माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या रिपोर्टनुसार, या सर्व सातही व्यक्तींचा मृत्यू शिवसागर जिल्ह्यात पाण्यात बुडाल्यामुळे झाला आहे.
लाखो नागरिक अजूनही पुराच्या त्रासाला तोंड देत असून हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मोठ्या प्रमाणात मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर केलं. यामध्ये मृतांच्या कुटुंबांना, विद्यार्थ्यांना आणि गंभीररीत्या बाधित झालेल्या कुटुंबांना विशेष आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत शिवसागर जिल्ह्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला. यासह या वर्षातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७५ वर पोहोचली आहे. सध्या शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासन सातत्याने बचावकार्य राबवत आहे.
३.३२ लाख लोकांना फटका, ६२२ गावं पाण्याखाली
६२२ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तब्बल ३,३२,६३९ नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. ४५,३४१.९८ हेक्टरवरील पिकं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. धनसिरी नदी नुमालीगड येथे अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना ९ लाखांची मदत
मदत पॅकेजची घोषणा करताना मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पूरबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. सरकारने पुरातील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार्या ४ लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाशिवाय मुख्यमंत्री मदत निधीमधून अतिरिक्त ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे प्रत्येक बाधित कुटुंबाला एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.