नरभक्षक वाघीण अखेर ठार, दीड वर्षात घेतला १३ जणांचा बळी

Foto

यवतमाळ -दीड वर्षांपासून १३ जणांचा बळी घेणारी वाघीण अखेर वनविभागाने ठार केली आहे. टी-१ वाघिणीला बोराटीच्या जंगलातील नाल्याजवळ ठार करण्यात आले. वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकावर वाघिणीने हल्ला केल्यानंतर तिच्यावर गोळी झाडण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. वाघिणीच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना शोधण्याचे आव्हान आता वनविभागासमोर आहे.

वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकाने सांगितल्यानुसार, शुक्रवारी रात्री पथक वाघिणीचा शोध घेत होते. शोधपथकातील शिकाऱ्याने वाघीण दिसल्यानंतर तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतू नरभक्षक वाघीण पथकावर चाल करुन आली. वाघीण आक्रमक झाल्यामुळे तिच्यावर गोळी झाडण्यात आली. वाघिणीला ठार केल्यानंतर पंचनामा करुन तिला नागपूरला हलवण्यात आले. येथील गोरेवाडा पशू केंद्रात राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या नियमांनुसार पोस्टमॉर्टम केले जाणार आहे.

दोन वर्षांपासून २२ गावांमध्ये वाघिणीची दहशत

दोन वर्षांपासून येथील २२ गावांतील २५ हजार नागरिकांमध्ये नरभक्षक वाघिणीची दहशत होती. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरु होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती मागवण्यात आले होते. यातील एका पिसाळलेल्या हत्तीनेच एका महिलेला ठार केल्याची घटना घडली होती.

५ शार्प शुटर ५०० कर्मचारी होते मागावर

वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने ५ शार्पशुटर, ३ पिंजरे आणि ५०० कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले होते. यासोबतच पॅराग्लायडरचीही मदत घेतली गेली होती. परंतू हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. याशिवाय गोल्फ खेळाडू ज्योती रंधावा यांच्या दोन इटालियन कुत्र्यांचीही मदत घेतली गेली होती. तरीही वाघिणीचा पत्ता लागला नव्हता.

सुप्रीम कोर्टाने दिले होते जेरबंद करण्याचे आदेश

वाघिण एकानंतर एक गावकऱ्यांचा फडशा पाडत होती. गावकऱ्यांचे नाहक बळी जात असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने वाघिणीला जेरबंध करा किंवा ठार मारा असे आदेश दिले होते. ही मागणी मुख्य वनसंरक्षकांनी कोर्टाला केली होती. अखेर शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारण्यात आले आहे. आता तिच्या दोन बछड्यांचा शोध घेऊन त्यांना सांभाळण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.