हळदही फिटली नव्हती अन काळाने घातला घाला !! सातव्या दिवशी नववधूचे निधन; सुरू होण्यापूर्वीच संसार संपला

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो):  नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून, आयुष्यभर एकमेकांच्या साथीने जगण्याचे वचन देऊन अवघे सात दिवस उलटले असताना नियतीने क्रूर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली. अशोकनगर येथील दीपाली लिहिणार हिचे लग्न संदीप खंडाळे यांच्यासोबत ४ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र लग्नाच्या अवघ्या सातव्या दिवशीच तिचे अकाली निधन झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अशोकनगर शिंदीबन येथील रहिवासी दीपाली संदीप खंडाळे- लिहिणार आणि संदीप खंडाळे यांचा १५ मे रोजी साखरपुडा पार पडला. त्यानंतर २ जून रोजी हळदीचा कार्यक्रम उत्साहात झाला. ४ जून रोजी विवाहसोहळा संपन्न झाला. नव्या संसाराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण नुकतेच सुरू झाले होते. लग्नानंतर पहिल्या मुळाला दीपाली माहेरी आली होती. अद्याप तिच्या अंगावरील हळदही फिटली नव्हती आणि संसाराची खरी सुरुवातही झाली नव्हती. अशातच अचानक तिला चक्कर आली. आणि ती खाली कोसळली. तिला तातडीने उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि तिची प्राणज्योत अखेर मालवली. 

या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिकही या घटनेमुळे भावुक झाले आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात होण्यापूर्वीच दीपालीची जीवनयात्रा संपल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आनंदाचे क्षण अचानक दुःखात बदलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपालीच्या अकाली निधनामुळे एक उमलणारा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला. अवघ्या सात दिवसांचा संसार, पण आयुष्यभर पुरतील अशा आठवणी मागे ठेवून दीपाली कायमची निघून गेली. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नसल्याची भावना कुटुंबीय आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत.

*लग्नाच्या आठवणी ताज्या असतानाच दुःखाचा डोंगर*
ज्यांच्यासोबत आयुष्यभराची स्वप्ने रंगवली, जिचा हात धरून सुख-दुःखात साथ देण्याची शपथ घेतली, ती जीवनसाथी इतक्या लवकर सोडून जाईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. लग्नाच्या आठवणी अजून ताज्या असतानाच घरात शोककळा पसरली आहे. दीपालीच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच तिच्या विवाहसोहळ्यात आनंदाने सहभागी झालेल्या नातेवाईकांनाही या घटनेवर विश्वास बसत नाही. लग्नाच्या मंगलधून अजून कानात घुमत असतानाच अंत्यसंस्काराची वेळ येणे, हे कुटुंबासाठी असह्य दुःख ठरले आहे.