गावच्या लेकीला... आहेर माहेरच्या साडी चोळीचा

Foto
पिंपरी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गावच्या लेकीचे लग्न झाल्यानंतर सासरी जाताना तिला माहेरच्या प्रेमाची आठवण म्हणून साडी चोळी भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपरी ग्रामपंचायत राबवत आहे. गावच्या महिला सरपंच जयश्री वाल्मीक अंभोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जयश्री अंभोरे यांनी मागील वर्षापासून हा स्तुत्य, सामाजिक व कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. गावातील एखादी मुलगी विवाह करून सासरी जात असताना तिच्या माहेरच्या प्रेमाची व गावाच्या आपुलकीची आठवण म्हणून ग्रामपंचायतीकडून साडी पीस भेट देण्यात येत आहे. माहेरची आठवण या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मुलगी ही गावाची लेक असून तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी ग्रामपंचायतीने दिलेला हा सन्मान तिच्यासाठी आनंददायी व भावनिक ठरत आहे. 

या उपक्रमामुळे गावामध्ये सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असून ग्रामपंचायत केवळ विकासकामांपुरती मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक व जिव्हाळ्याचे उपक्रम राबवत असल्याचे दिसून येते. महिलांचा सन्मान व गावाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री वाल्मीक अंभोरे, ग्रामविकास अधिकारी ए. बी. रगडे, उपसरपंच मनीषा गणेश अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर अंभोरे, अरुण अंभोरे, जिजाबाई साळवे, ललिता शिंदे, रेखा अंभोरे, अशोक साळवे आणि संगणक परिचारक विष्णू अंभोरे यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.