सातारा-देवळाईकरांची पाण्यासाठीची प्रतीक्षा संपणार

Foto
मुख्य वाहिनी जोडण्याचे काम वेगाने
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वर्षानुवर्षे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. या परिसरातील नागरिकांना लवकरच नळाद्वारे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा-देवळाई भागात उभारण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि 'जीवीपीआर' या कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी क्रॉस लाईन जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा पोलीस ठाण्याच्या मागे बांधलेल्या टाकीला
बीड बायपास येथील संग्रामनगर उड्डाणपुलाखाली मुख्य क्रॉस लाईन टाकून जोडले जात आहे. हे काम पूर्ण होताच या भागात पाणीपुरवठ्याला मोठी गती मिळणार आहे. क्रॉस लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भूमीगत जलवाहिनीतून पाणी सोडून चाचणी घेतली जाईल. या दरम्यान पाणी गळती व इतर तांत्रिक त्रुटींची तपासणी केली जाणार असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
टाकीत पाणी पोहचल्यानंतर महापालिकेच्या वतीने टप्प्याटप्याने सातारा परिसरात नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा केला जाईल. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी 'नो-नेटवर्क' क्षेत्रात नळ कनेक्शनचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या अधिकृत प्लंबरमार्फत ठराविक शुल्क आकारून हे कनेक्शन दिले जाणार आहेत. माजी नगरसेविका सविता कुलकर्णी व पदमसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य क्रॉस लाईनचे काम पूर्ण होऊन टाकीत पाणी जमा झाल्यास सातारा परिसरातील किमान ३० टक्के नागरिकांना लगेच पाणीपुरवठा होऊ शकतो.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions