इंफाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या मनिपूरच्या दौऱ्यावेळी हिंदू धर्माबाबत केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. हिंदू समाज जग टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले आहेत, हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व संपून जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मणिपूर भेटीदरम्यान एका सभेला संबोधित करताना भागवत यांनी हिंदू समाज हा अमर असल्याचे म्हटले. तसेच यूनान (ग्रीक), मिस्र (इजिप्त) आणि रोम यासारखी साम्राज्य नष्ट झाली पण भारताने अजूनही आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
जगभरातील मोठं-मोठी साम्राज्य काळाबरोबर नष्ट झाली मात्र भाताने आपले अस्तित्व टिकवल्याचा मुद्दा मांडताना आरएसएस प्रमुख म्हणाले, परिस्थितीचा विचार तर सर्वांना करावा लागतो. पण परिस्थिती येते आणि जाते. जगात सर्व देशांना वेगेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागला. काही देश त्यामध्ये संपुष्टात आले. यूनान, मिस्त्र, रोमा सब मिट गये जहां से, कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी (ग्रीक, इजिप्त, रोम यासारखी साम्राज्य जगातून नष्ट झाली, काहीतरी असेल की आपले अस्तित्व संपुष्टात आले नाही), असे मोहन भागवत म्हणाले.
तर जगही राहणार नाही
आरएसएस प्रमुख मणिपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना यासंबंधी वक्तव्य केले. मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, भारत हे एक अमर समाजाचे नाव आहे. बाकी सर्व आले, चमकले आणि निघून गेले. मात्र या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे आणि आपण अजूनही आहोत आणि राहणार आहोत. कारण आपण आपल्या समाजाचे एक बेसिक नेटवर्क तयार केले आहे. ज्यामुळे हिंदू समाज टिकून राहिल. हिंदू राहिला नाही, तर जगही राहणार नाही, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.