नागपूर : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. अशातच नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये चक्क बारावीचे दोन विषयांचे पेपर फुटल्याची माहितीसमोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता. नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकरण उघडकीस आला आहे.
खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती
दरम्यान, सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला. यावरून तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला आढळून आला होता. या प्रकरणी केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केलाय. तर मोबाईलमध्ये व्हाट्सअप वर १५ विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. सध्या दोन्ही विद्यार्थनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली आहे.
पुण्यात शिक्षकानेच पुरवली केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी, बोर्ड करणार कारवाई
पुण्यातील धायरी परिसरातील एका केंद्रावर चक्क शिक्षकानीच कॉपी पुरविल्याचे उघड झाले आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून असे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. येथे नियुक्त शिक्षकाला या शिक्षकाने चिरीमिरी देऊन चहापानासाठी बाहेर पाठवले आणि वर्गाचा ताबा घेत विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीच्या पेपरला लागणारे लाँगबुक वाटून कॉपी करण्यास प्रवृत्त केले. आता हा सगळा प्रकार विद्यार्थ्यानेच पालकाला सांगितले. घडलेल्या प्रकरणानंतर आता बोर्डाने या शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.