भाजपाला वेगळाच माज आला आहे...राज ठाकरेंची टीका, लोकांना स्क्रिनच्या बाहेर येण्याचे आवाहन

Foto
मुंबई : सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर येथे उपोषण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर तीव्र टीका केली. वांगचुक यांच्या ढासळत्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना या गंभीर सामाजिक प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, असे मत त्यांनी मांडले.

दरम्यान भाजपाला वेगळाच माज आला असून लोकांनी स्क्रिनच्या बाहेर यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ५९ वर्षांच्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. पेपरफुटी आणि शैक्षणिक घोटाळ्यांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहेत्यांची तब्येत सातत्याने ढासळताना दिसत असून अनेकांकडून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात मत मांडत सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहीली आहे.सोनम वांगचूक हे ज्या मुद्यांसाठी आमरण उपोषण करत आहेत, ती रास्त मागणी आहे आणि सरकारने ती मागणी मान्य केली पाहिजे, असं मत राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

भाजपला माज आला आहे
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेले यश हे लोकांच्या मूकसंमतीचे द्योतक म्हणून दाखवायचे आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

पंतप्रधानांना केली विनंती 
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला.  परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाही आहे. हा विषय सामाजिक आहे.  परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.