नागपूर : प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्र सुन्न झाले आहे. मृत्यूच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी काढलेला 'ईसीजी' नॉर्मल असतानाही आलेला तीव्र हृदयविकाराचा झटका, तसेच 'गोल्डन अवर'मध्ये तज्ज्ञांकडून उपचार मिळूनही जीव वाचू न शकणे, यामुळे हृदयविकाराचा 'अदृश्य' धोका पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पाखमोडे यांचा 'ईसीजी' नेमका कुणाला दाखवण्यात आला होता, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हृदयरोग तज्ज्ञाच्या मते, केवळ एकदाच काढलेला 'ईसीजी' हृदयविकाराचे संपूर्ण निदान करू शकत नाही. तो एखाद्या हृदयरोगतज्ज्ञाला दाखवला असता, तर योग्य तपासण्या, जसे की स्ट्रेस टेस्ट, इको किंवा अँजिओग्राफी यांचा सल्ला दिला गेला असता. डॉ. पाखमोडे यांना कोणत्या कारणांमुळे जीवघेणा स्ट्रेस आला असावा यावरून चर्चा आहे.
ती पार्टी शेवटची ठरली
मंगळवारी रात्री डॉ. पाखमोडे एका डॉक्टरांच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळी ते अनेक सहकाऱ्यांना भेटले, हसत-खेळत संवाद साधत होते. त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलाही धोका जाणवेल, असे संकेत कुणालाच मिळाले नव्हते.
तणाव ठरले असावे कारण
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांनी सांगितले की, डॉ. पाखमोडे यांचा स्वभाव संयमी असूनही दीर्घकाळचा शारीरिक व मानसिक तणाव हा या घटनेमागील महत्त्वाचा घटक ठरला असावा.
आज अनेक जण व्यसनमुक्त असतात, नियमित व्यायाम करतात आणि आरोग्य तपासणीही करतात. तरीही अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका येतो.
यामागे केवळ आनुवंशिकता नाही, तर अतितणाव, वायू व ध्वनी प्रदूषण, तसेच अन्नपदार्थामधील रासायनिक घटक व पेस्टिसाईड्स यांचा मोठा वाटा आहे.
तणावामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण पडतो. प्रदूषणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये दाह वाढून अचानक हृदयक्रिया थांबण्याचा धोका वाढतो.