शेतकऱ्यांशी साधला संवाद, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असून जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यातील पिके हातची गेली आहे. तर काही पिकांची वाढ खुंटली आहे परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांन रविवारी (दि. २०) रोजी वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पिकस्थितीची पाहणी केली. आमदार रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.
पालकमंत्रीसंजय शिरसाट यांनी रविवार (दि. २०) रोजी मौजे जांबरगाव ता. वैजापूर येथे टंचाईच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली.
त्यांचे समवेत तहसिलदार सुनिल सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच स्थानिक अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांशीही संवाद साधला. लोकांची मते जाणून घेतली. पिकांची स्थिती पाहून पालकमंत्री शिरसाट यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शासन शेतकऱ्यांच्य पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
















