मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेचा संयुक्त 'वचननामा' जाहीर केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावले आहे. व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. त्यांना सुरक्षा काढून घेण्याचे अधिकार हे विधानसभेत आहेत. बाहेर नाहीत. तरीही ते फोनवरून आदेश देत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जावी. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव आणि राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेचा वचननामा आज जाहीर केला. यावेळी दोन्ही ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.
महापालिकेच्या ठेवी या चाटायला नसतात...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत चुकीचे बोलले. मुंबई महापालिकेच्या ठेवी या चाटायला नसतात. मी म्हणतो, या ठेवी कंत्राटदारांचे बुट चाटून वाटायला नसतात. तीन लाख कोटींचा घोटाळा मुंबई महापालिकेत या खोकासुराने केलेला आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी माणूस हा हिंदू नाहीय का, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने कोरोना काळात आम्ही काय केले, त्याची पुस्तिका रद्द केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केले. कोरोना काळात निवडणूक आयोगाच्या संमतीने काम केलेले नव्हते. आम्ही या निवडणुकीत हे काम सांगणार, निवडणूक आयोगाने आम्हाला अडविण्याची हिंमत करून दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.