राजयोग संपला, मोदींची सत्ता पुन्हा येणार नाही : संजय राऊत

Foto
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता येणार नाही. मोदी एप्रिल- मे महिन्यात सत्तेतून पायउतार होतील. त्यांचा राजयोग संपला आहे. देशात २०२९मध्ये मोठं परिवर्तन होणार आहे, असा दावाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत आज छत्रपती संभाजी नगरच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना मोदी सरकारचं भाकीतच वर्तवलं आहे.

संजय राऊत यांना राजस्थानच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आलं होतं. यावेळी राऊत यांनी हा मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राजस्थानच्या ३६ पैकी ३२ जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली आहे. याचा अर्थ देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. राजस्थानसारख्या निवडणुकीतील हे प्रतिबिंब देशभर दिसणार आहे. जनतेचा दबाव निवडणूक यंत्रणेवर आहे. त्यामुळे राजस्थानात त्यांना गडबड, घोटाळे करता आले नाही. म्हणूनच भाजपविरोधातील हा प्रवाह या मतदानात दिसला. हा दबाव कायम राहिला तर २०२९मध्ये १०० नव्हे ५०० टक्के या देशात मोदींची सत्ता येणार नाही. मोदींचा राजयोग संपलेला आहे. हे मी वारंवार सांगतोय, असं संजय राऊत म्हणाले.

२०२९ पर्यंत पूर्ण परिवर्तन
मोदी आणि शाहांच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाचा विश्वास नाही. हे राज्य लवकर जावं सर्वांना वाटतं आहे. फक्त ज्ञानेश कुमार यांनाच वाटत असेल मोदींचं राज्य राहावं. पण ज्ञानेशकुमारही जातील. एप्रिल किंवा मेपर्यंत मोदीही जातील. २०२९ पर्यंत देशात पूर्ण परिवर्तन झालेलं दिसेल, असा दावा राऊत यांनी केला.

डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांना १५० कोटी? 
दरम्यान केंद्र सरकार पुन्हा एकदा डीलिमिटेशन बिल आणणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही राजकीय पक्षांना आपल्याकडे ओढण्याचा केंद्राचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही महाविकास आघाडीच्या सूरापेक्षा वेगळा सूर लावला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी १५० कोटींचा भाव लावला आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा १०० कोटी होता, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.डीलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी १५० कोटींचा भाव लावण्यात आला आहे. होलसेलमध्ये खासदारांना आपल्याकडे ओढलं जात आहे. म्हणून भाजप संसदेचं अधिवेशन घेत नाही. त्यांची खासदारांची जुळवाजुळव सुरू आहे. या विधेयकाला महाराष्ट्रातील खासदारांनी पाठिंबा दिला तर माझा आकडा लक्षात ठेवा. दोन दिवसात १०० कोटींवरून १५० कोटींचा आकडा झाला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील पुढार्‍यांवर जबाबदारी
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. अमित शाह कितीवेळा मुंबईत आले? अमित शाह वारंवार मुंबईत का येतात? काय व्यवहार चालले आहेत? खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा पैसा मुंबईतून जाणार आहे. याची जबाबदारी मुंबईतील, महाराष्ट्रातील काही प्रमुख पुढार्‍यांवर दिली आहे. ही रक्कम चिंता करण्यासारखी नाही. ५ वर्षापूर्वी ५० कोटीला आमदार आणि ७५ कोटीला खासदार विकला गेला होता. त्यामुळे १५० कोटी ही सन्मानीय रक्कम आहे. चांगली रक्कम दिली आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

आमचे खासदार ८० कोटीला
आमचे सहा खासदार गेले होते. ते प्रत्येकी ८० कोटीला विकले गेले. पण त्यांना निवडून आल्यावर १५ कोटी आधीच मिळाले होते. हे एकनाथ शिंदेंचं डील होतं. आताचा भाव हा राष्ट्रीय भाव आहे. जसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव आहे, तसा हा पॉलिटिकल नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.