नवी दिल्ली : आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आठवा दिवस असून इस्रायली आणि अमेरिकन सैन्याने इराणी प्रमुख लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागली. तर इराणनेही प्रतिहल्ला सुरुच ठेवला. आजही इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर तसेच इतर ठिकाणी इराणी हल्ले सुरूच आहेत. या युद्धात आतापर्यंत ५ हजारांवर बॉम्ब फेकण्यात आले असून या युद्धात १२०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. हे युद्ध म्हणजे युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा असल्याची प्रतिक्रिया जगभारातून उमटत आहे.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी मारले गेले. अमेरिका आणि इस्रायलने तीन दिवसांत ५ हजारहून अधिक बॉम्ब टाकले आहेत, ज्यामध्ये इराणमध्ये १२०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले की, इराणवर आज रात्री सर्वात मोठा हल्ला केला जाईल. त्यांनी सांगितले की या हल्ल्याचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र लाँचर्स आणि क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यांना लक्षणीय नुकसान पोहोचवणे आहे. या कारवाईमुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता लक्षणीयरीत्या कमकुवत होईल. इस्रायलने तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हवाई हल्ला केला, ज्यामुळे आग आणि धुराचे लोट पसरले आहेत.
दरम्यान, युद्धादरम्यान रशिया इराणला गुप्तचर मदत पुरवत असल्याचे वृत्त आहे. मॉस्कोने इराणला मध्य पूर्वेतील अमेरिकन युद्धनौका आणि लष्करी विमानांच्या ठिकाणांबद्दल माहिती पुरवली आहे.
वॉशिंग्टन पोस्टने तीन अमेरिकन अधिकार्यांच्या हवाल्याने वृत्त दिले की, रशिया इराणला लक्ष्यीकरण करणारी गुप्तचर माहिती पुरवत आहे ज्यामुळे ते अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करू शकतील.
अमेरिका इस्रायलला अंदाजे १५१.८ दशलक्ष किमतीची शस्त्रे पुरवणार असून ट्रम्प यांनी अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र मुज्तबा यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. दरम्यान इराणमध्ये अनेक ठिकाणी पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. कुवेत, बहरीन आणि युएईमधील १४ अमेरिकन तळांचे नुकसान झाले.