फुलंब्री, (प्रतिनिधी): येथील टी पॉइंट परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणारी वाहतूक कोंडी आणि रविवारी ५ तासांच्या जामची दखल घेत अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. नॅशनल हायवे अॅथॉरिटी, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महामार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची मोठी मोहीम राबवण्यात आली.
रविवारी शहरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
पाच तास प्रवासी आणि नागरिक उन्हात अडकून पडले होते. काही महिन्यांपूर्वी महामार्गे प्राधिकरणाने १५ मीटरची मार्किंग केली होती. त्यावेळी कारवाई टळली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही प्रलंबित कारवाई प्रत्यक्ष सुरू केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील अनधिकृत पत्राशेड, टपया, तात्पुरते शेड आणि हातगाड्या हटवल्या, त्तामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहरातून होणारी वाहतूक आता सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महामार्ग उपविभागाचे सहायक अभियंता ए. डी. महाजन यांनी सांगितले की, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्गाच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना प्रत्येकी १५ १५ मीटर अंतरावरील सर्व अतिक्रमणे काढली जात आहेत. ही मोहीम सुरू झाली आहे. जोपर्यंत मार्ग पूर्णपणे मोकळा होत नाही, तोपर्यंत ती सुरूच राहील.
-- माल जप्त करून गुन्हे दाखल करणार --
महामार्गावर कोणीही अनधिकृतपणे हातगाडी किंवा दुकान लावू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित हातगाडी व सामान जात करण्यात येईल, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.
- ज्ञानेश्वर ठोंबरे, मुख्याधिकारी, नगरपंचायत
बेशिस्त पार्किंगवर दंड
रस्त्यावर किंवा दुकानांच्या समोर कोणीही आपली वाहने उभी करू नयेत. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास वाहन जप्त करून दंड आकारण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल
- संभाजी वडते, सहायक पोलीस निरीक्षक














